राजापूर:-दुचाकी चोरून कोल्हापूरच्या दिशेने पळून जाताना पोलिसांना पाहून अणुस्कूरा घाटातील जंगलात लपलेल्या अन्य दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सलग दोन दिवस जंगलात शोधमोहीम राबविल्यानंतर सोमवारी सकाळी या दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दोन बाईक वरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते व तेथे त्यांनी पिस्तूल सारख्या दिसणाऱ्या लाईटरने ओणी मधील एका-दोघांना धमकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती राजापूर पोलीसांना देण्यात आली होती. दरम्यान ओणीवरून अनुस्कुरा घाटाच्या दिशेने दोन बाईक वरून ते तिघेजण निघाले होते. मात्र अनुस्कुरा येथील चेकपोस्टवर असलेले पोलीस पाहून ते हबकले आणि त्यांनी येरडवच्या दिशेने पलायन केले. वाटेतच दोन्ही बाईक टाकून ते आजूबाजूला असलेल्या जंगलात जाऊन लपले.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करून येरडवसह अणुस्कूरा घाटात शोधमोहीम राबविण्यात आली. शोध सुरू असताना एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अन्य दोघे जंगलात लपून बसले होते. शनिवार रात्रीपासून पोलीस तसेच आरसीपी टीम या दोघांचा शोध घेत होती. अखेर सोमवारी सकाळी हे दोघे जंगलातून बाहेर येवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी होंडा युनिकॉन, व केटीएम डुक या दोन बाईक चोरून पुण्याच्या दिशेने ते चालले होते. दोन्ही गाड्यांवर नंबर प्लेट नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील सुनील सुर्वे यांची गाडी दि.16 मे रोजी चोरीला गेली होती, ती गाडी त्या तिघांकडे आढळून आली आहे.
या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, उपनिरीक्षक मोबीन शेख, आरसीपी टीम इन्चार्ज ज्ञानेश्वर साखरकर यांच्यासह राजापूर पोलीस व आरसीपी टीमच्या कर्मचाऱयांनी सलग दोन दिवस जंगलात शोध मोहीम राबवून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कामगिरीबद्दल पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण करीत आहे.