दापोली:-मागील वर्षभरात विद्यापीठाने साधलेली प्रगती समाधानकारक आहे. वाकवली येथे पदव्युत्तर विद्याशाखा स्थापन करणे, विद्यापीठाचे रेडिओ स्टेशन कार्यान्वित करणे, तसेच युटयुब, फेसबुक, वार्तापत्र इत्यादीच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे नियोजित प्रकल्प पूर्ण करणार, अशी ग्वाही कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय संजय भावे यानी दिली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ५२ वर्धापन दिन रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. भावे म्हणाले, आत्तापर्यंत साधलेल्या प्रगतीमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच मजूर यांचा सिंहाचा वाटा आहे. ५२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर १०० फुट उंचीच्या ध्वजस्तंभावर ३० बाय २०राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण कुलगुरू भावे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रांगणात तो कायमस्वरुपी डौलाने फडकत राहणार आहे.
विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या संस्थात्मक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, उत्कृष्ट संशोधन संशोधन केंद्र म्हणून कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट तर उत्कृष्ट कृषी विस्तार केंद्र म्हणून दापोली येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र तर उत्कृष्ट तंत्र विद्यालय म्हणून मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालयाला प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि पाच लाखांचा धनादेश कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
डॉ. प्रफुल्ल आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅग्रीकॉस प्रस्तुत मेलेडी सिंगर्स हा जुन्या बहारदार गाण्यांचा ऑक्रेस्ट्रा आयोजित केला होता. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १७ मे रोजी विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वस्त्रहरण नाटकाचा तुफान विनोदी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.