राजापूर:-राजापूर तालुक्यातील जानशी येथे रस्त्यालगत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. उपासमारीने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात येत असून वनविभागाकडून बिबट्याच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी महेश पटवर्धन यांच्या मालकीच्या बंदीस्त कंपाऊंडच्या बाजूला रस्त्यालगत बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडल्याची माहिती जानशी पोलिस पाटील राजेंद्र कृष्णा तांबे यांनी राजापूर वनविभागाला दिली. त्यानंतर राजापूर वनपाल यांनी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना याबाबत माहिती देत वनविभागाचे कर्मचारी व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मृत बिबट्या बछडा हा मादी असून त्याचे वय साधारण तीन महिने असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यानी सांगितले.
दरम्यान मृत बिबट्याला विषबाधा अथवा त्याची शिकार झाली आहे काय याची खात्री करण्यासाठी राजापूर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र सदरचा बिबट्या हा उपासमारीमुळे मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांनी सांगितले.