चिपळूण:-सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण सुरू असलेल्या कामामुळे पेढे येथील सर्व्हीस रोड चिखलाने माखला होता. यामध्ये तब्बल 25हून अधिक दुचाकीस्वार घसरून पडले. चौपदरीकरणातील एका मार्गिकाचे काम सुरू असताना भरावाची माती पावसात खाली आल्याने असंख्य वाहनचालकांना त्याचा फटका बसला.
पेढे-परशुराम ते खेरशेत या टप्प्यात पेढे फरशी तिठा येथे मोठा भराव टाकून चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यातील एक मार्गिका वाहतुकीस खुली करण्यात आली असून दुसऱ्या मार्गिकाचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्याप्रमाणात भराव करण्यात आला आहे. शनिवारी तसेच सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसात भरावी माती थेट सर्व्हीस रोडवर आल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले.
फरशी तिठा येथे मुंबई, वालोपे, चीपळूण शहर व गुहागरकडून वाहने येतात. त्यामुळे फरशीतिठा येथे वाहनांची नेहमी वर्दळ असते. सायंकाळच्या वेळेत तर लोटे औद्योगिक वसाहतीत काम करणारा कामगार, अधिकारी वर्ग हा सर्व्हीस रोडने चीपळूणकडे येत असल्याने काहीवेळेला वाहतूककोंडीलाही समोर जावे लागते. सोमवारी कोसळलेल्या पावसात सर्व्हीस रोडवर चिखल झाल्यानंतर येथून प्रवास करणारे असंख्य दुचाकीस्वार घसरले. तब्बल 25 हून अधिक दुचाकी येथे घसरल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यानंतर मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून बारीक खडी टाकून सर्व्हीस रोड वाहतुकीस चांगला केला.