रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गुरववाडी येथे आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास माती वाहतूक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोतील दोघेजण जखमी झाले आहेत. यातील एकाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
रत्नागिरीतून मिरज येथे जाण्यासाठी निघालेला टेम्पो क्रमांक एम एच ०९ एफऐल ४०६८ घेऊन टेम्पो चालक निलेश साळुंखे (वय ३०, रा. नांद्रे ता. मिरज, सांगली) आणि गणेश कोळी (वय ३०, रा. नांद्रे ता. मिरज, सांगली) हे दोघेही मिरजच्या दिशेने प्रवास करीत असताना हातखंबा गुरववाडी येथे आले असता समोरून येणार्या डंपरने विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त डंपर हा पालीतून रत्नागिरीच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. या डंपरमध्ये माती भरलेली होती. डंपर चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक इतकी जोराची होती की, डंपर धडक देऊन समोरच्या टेम्पोवरच पलटी झाला. या अपघातात टेम्पो चालक निलेश साळुंखे व गणेश कोळी हे दोघेजण केबिनमध्ये मध्येच अडकले होते त्यांना पोलिसांनी बाहेर काढले.
अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून काही क्षणात पळून गेल्याचे समजते. टेम्पोत अडकलेल्या गणेश कोळी यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली असून टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्र हातखंबाचे वाहतूक पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. टेम्पोत अडकलेल्या दोघांनाही स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.