रत्नागिरी :शून्य सावली दिवस आज मंगळवारी सर्वांना अनुभवता येणार आहे. या दिवशी पृथ्वीवर +23.5° आणि -23.5° अंश(किंवा 23.5° उ. आणि 23.5°द.)अक्षांश दरम्यानच्या ठिकाणी दरवर्षी दोनदा अनुभवता येतो. या दोन दिवशी, सूर्य दुपारच्या (मध्यान) वेळी त्या ठिकाणी अगदी डोक्यावर येतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही.
इतर दिवशी रोज दुपारच्या वेळी सूर्य कधीच डोक्यावर नसतो, तो थोडा उत्तरेकडे किंवा थोडा दक्षिणेकडे सरकलेला असतो. पृथ्वीवर +23.5 आणि -23.5 अंश अक्षांश दरम्यानच्या ठिकाणांसाठी, सूर्याची अवकाशातील क्रांती(सूर्याचे खगोलावरील स्थान सांगणारा एक निर्देश बिंदू) दोनदा त्या ठिकाणांच्या अक्षांशाच्या एवढी असते. एकदा उत्तरायणादरम्यान आणि एकदा दक्षिणायनादरम्यान. या दोन दिवशी, सूर्य दुपारच्या (मध्यान) वेळी अगदी डोक्यावर असतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही. यालाच शून्य सावली म्हणतात.
रत्नागिरी येथे ७ मे रोजी हा खगोलीय आविष्कार अनुभवता येणार आहे. या दिवशी दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनी (भारतीय प्रमाण वेळेनुसार ) आपण याची प्रचिती घेऊ शकतो. रत्नागिरीचे अक्षांश + १६.९८ उ. आणि रेखांश ७३. ३ पू. असल्याने ७ मे रोजी ही घटना घडतांना प्रत्यक्ष पाहता येईल.
रत्नागिरीप्रमाणेच सांगली, मिरज, राजमुंद्री या ठिकाणीही या दिवशी शून्य सावलीचा अनुभव घेता येईल. 5 ऑगस्ट रोजी सुद्धा पुन्हा हिच खगोलीय घटना पाहता येईल पण आपल्याकडे पावसाळा असल्यामुळे आपण या घटनेपासून बहुतेक वेळा वंचित राहतो.
आज रत्नागिरीत शून्य सावली दिवस
