रत्नागिरी:-जिल्ह्यातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 7 मे रोजी जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़ तसेच मतदारांच्या काही शंका असल्यास भेटण्यासाठी निरीक्षक भुवनेश प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल़ी.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानादिवशी जिल्ह्यात ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरवण्यात येतो, त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, यासाठी बाजार व जत्रा अधिनियम 1962 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यातील देव्हारे, लाटवण, दापोली तालुक्यातील विसापूर, खेड तालुक्यातील भरणे, चिपळूण तालुक्यातील वहाळ, संगमेश्वर तालुक्यातील कडवई, तुळसणी, फुणगूस, वांद्री, रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, मालगुंड, चांदोर, राजापूर तालुक्यातील कात्रादेवी व लांजा येथील 7 मे रोजी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नागरिक व मतदारांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक, सर्वसाधारण भुवनेश प्रताप सिंग (आयएएस) यांना सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळनाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-876723661 असा आहे.
निवडणूक निरीक्षक, पोलीस सुधांशु शेखर मिश्र (आयपीएस) यांना सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळनाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-7620444645 असा आहे. निवडणूक निरीक्षक, खर्च अंकुर गोयल (आयआरएस) यांना सायंकाळी 4 ते6 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळनाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा ङभ्रमणध्वनी क्रमांक-8766981846 असा आहे.
सर्वसाधारण निरीक्षकांच्या उपस्थितीत तिसरे मनुष्यबळ सरमिसळ
सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग, निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रविवारी तिसरे मनुष्यबळ सरमिसळ पार पडले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी 385, राजापूर विधानसभा मतदार संघासाठी 379 आणि चिपळूण विधानसभा मतदार संघासाठी 373 पथके निर्माण करण्यात आली आहेत. यात 4 सखी केंद्र, 4 दिव्यांग केंद्र आणि 3 युवा केंद्रांचाही समावेश आहे. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.