गुहागर:-गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये 500 रुपयांच्या 80 बनावट नोटा भरल्याप्रकरणी झोंबडीचे सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्याविरोधात गुहागर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर पोलीस ठाण्यामध्ये बँक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखेच्यावतीने मुकुंद श्रीपाद खांडेकर (49) यांनी बनावट नोटा मिळाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. 30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5.30च्या सुमारास शृंगारतळी येथील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये आरोपी खातेधारक अतुल अनंत लांजेकर यांनी आपल्या खात्यात 40 हजार रुपये किंमतीच्या 500 रुपयांच्या 80 बनावट नोटा या नकली नोटा असल्याची जाणीव असतानाही त्यांनी या बनावट नोटा स्वत:कडे बाळगून त्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या. त्याचा वापर केल्याने फिर्यादीनी त्यांच्याविरूध्द तक्रार नोंदवली. या प्रकरणी अतुल लांजेकर यांच्याविरोधात भादंवि कलम 489(ब), 489 ( क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आता या नोटा कुठून, कशा आल्या, या बाबतचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.