रत्नागिरी:-लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून काल सायंकाळी जाहीर प्रचार संपला आहे. पण या प्रचाराच्या काळात कोकणातील वानर माकडांच्या उपग्रहाचा महत्त्वाचा प्रश्न एकाही उमेदवाराने प्रचार सभेत मांडलेला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
वानर-माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे गोळप येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अविनाश काळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, गेली सुमारे दोन वर्षे वानर-माकडांच्या शेतीला होणाऱ्या प्रचंड उपद्रवाबाबत मी आणि शेकडो शेतकरी आंदोलन करत आहोत. तात्पुरता उपाय म्हणून वानर-माकड पकडुन अभयारण्यात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कायमचा बंदोबस्त हवा असेल तर संसदेत हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर-माकडांना उपद्रवी पशू घोषित करणे गरजेचे आहे.
या समस्येबाबत राजकीय कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांपर्यंत ही समस्या पोहोचवली का, की ही समस्या त्यांना वाटत नाही? एकाही उमेदवाराने रत्नागिरी सिंधुदुर्गातील वानर-माकड उपद्रव या गंभीर समस्येची दखल घेतलेली दिसली नाही. कोणत्याही प्रचारसभेत या प्रश्नाबाबत भाष्य केलेले नाही.
सगळ्या उमेदवारांना मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी किती काळजी आणि मतदारसंघातील प्रश्नांची किती जाण आहे हे यातून स्पष्ट झाले आहे, असे सांगून काळे म्हणाले, राजकीय कार्यकर्ते आपल्या उमेदवारांपर्यंत मतदारसंघातील सगळे प्रश्न पोहोचवत नाहीत, असा याचा अर्थ होतो. विषय लक्षात आहे, प्रश्न मांडून सोडविण्याचे नियोजन सुरू आहे, फक्त उल्लेख करायचा राहिला आहे, असे समजायचे का? हा प्रश्न उमेदवारांनी आता लक्षात घेतला नाही तर नंतर प्रश्न मांडायला आम्हाला दिल्लीत जावे लागण्याची शक्यता आहे, असेही ॲड. काळे म्हणाले.