रत्नागिरी:-तालुक्यातील गोळप मुसलमानवाडी येथील आंबा बागेत दोघा नेपाळी भावांचा खून करणाऱ्या संशयिताला पुर्णगड पोलिसांकडून अटक करण्यात आली. शरणकुमार विश्वकर्मा (58, रा.गोळप मुळ नेपाळ) असे संशयिताचे नाव आहे. मृत व शेजारील बागेत काम करणारा शरणकुमार हे 29 रोजी रात्री एकत्र दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी आईवरून शिवी दिल्याच्या रागातून दोघांचा खून केल्याची कबुली शरणकुमारने पोलिसांजवळ दिल़ी घटना घडल्यापासून चार दिवसांत खूनाची उकल करण्यात पूर्णगड पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळप मुसलमानवाडी येथील मुदस्सर मुकादम यांच्या आंबा बागेत भक्त बहाद्दुर थापा (72) व खडकबहाद्दुर थापा (65 रा.दोन्ही कैलाली नेपाळ, सध्या गोळप) यांचा खून झाल्याचा पकार समोर आला होता. 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खूनाची घटना उघडकीस आली. पुर्णगड पोलिसांकडून याप्रकरणी भादंवि कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच गोळप परिसरात राहणारे सर्व नेपाळी कामगार, आंबा चोरी करणारे सराईत, बाग मालक यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली होती.
शरणकुमारच्या उलटसुलट जबाबाने संशय बळावला.
पोलिसांकडून जवळपास आंबा बागेत काम करणा-या 25 गुरख्यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. यातील शरणकुमार याच्याकडून समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळत नव्हती. शरणकुमार हा उलटसुलट जबाब देत असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आपणच खून केला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
घटनेच्या दिवशी एकत्र दारू पिण्यासाठी बसले होते.पोलिसांच्या तपासामध्ये शरणकुमार विश्वकर्मा यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. शरणकुमार हा घटनास्थळापासून लगतच असलेल्या आंबा बागेत राखणीचे काम करत़ो 29 एप्रिल रोजी सायंकाळी भक्त बहाद्दुर त्याचा भाऊ खडकबहाद्दुर व शरणकुमार हे तिघे दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिऊन झाल्यानंतर तिघेही भक्त व खडकबहाद्दुर राहत असलेल्या ठिकाणी आले. त्याठिकाणी पुन्हा एकदा तिघांनी दारू पिण्यास सुरूवात केली.
शिवी दिल्याने वाद आला उफाळून
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एकत्र दारू पित असताना तिघांमध्ये मागील काही कारणावरून वाद उफाळून आला. यातून भक्त व खडकबहाद्दुर यांनी आईवरून शिवी दिल्याने शरणकुमार याच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरात शरणकुमार याने जवळच पडलेल्या धारधार शस्त्राने भक्त व खडकबहाद्दुर या दोघांवरही सपासप वार केले. हे वार वर्मी बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.शरणकुमारने खूनातील शस्त्र लपविले.
खून केल्यानंतर शरणकुमार हा पुरता घाबरून गेला. आपण पकडले जावू या भितीने त्याने धारधार शस्त्रासह तेथून पळ काढला. यावेळी त्याने आपल्याकडील असलेले धारधार शस्त्र देखील लपवून ठेवले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आता हे शस्त्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.