रत्नागिरी:-लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. तर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचा फौजफाटा तयार आहे. तसेच मतदान करताना काही तांत्रीक अडचणी आल्यास त्यावर तोडगा म्हणून अधिकची मतदान यंत्रसुद्धा सज्ज करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णयअधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हापरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार उपस्थीत होते. यावेळी 7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा देण्यात आला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीसाठी मतदारांना देण्यात येणारी मतदार स्लिपचे वाटप आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 78 पुर्णांक 18 टक्के स्लिपचे वाटप पुर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात हे वाटप पुर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचसोबत मतदान यंत्र, मतदान पडताळणी यंत्र तसेच नियंत्रण यंत्रांची तपासणी पुर्ण करुन मतदान केंदाच्या संख्येपेक्षा जास्त मतदान यंत्र उपलब्ध करुन ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 1 हजार 942 मतदान पेंदावर 2 हजार 793 मतदान यंत्र, 2793 नियंत्रण यंत्र आणि 2 हजार 901 मतदान पडताळणी यंत्र सज्ज करण्यात आली आहेत.
तसेच 6 हजार 250 कर्मचारी तसेच मतदान यंत्र योग्य वेळेत मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहनांचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे. यासाठी एसटीच्या 125गाड्याचे आरक्षण करण्यात आले आहे. तर 238 इतर वाहने आणि 54 मिनी बसची सोय करण्यात आली आहे.