दापोली:-तालुक्यातील आपटी बोरघर येथील रहिवासी व माजी सरपंच दीपक बैकर यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बैकर यांनी आपले नाव यादीत पुन्हा घेण्याबाबतचे निवेदन प्रातांधिकाऱ्याना दिले आहे.
बैकर हे आपटी बोरघर येथील रहिवासी आहेत. त्यांचे नाव 2022 सालच्या मतदार यादीत दाखल होते. परंतु आता 2024 सालच्या लोकसभा मतदार यादीत त्यांचे नाव आढळून येत नाही. बैकर यांनी या बाबत बीएलओ व तहसीलदार कार्यालय, दापोली निवडणूक अधिकारी समीर सावंत यांच्याकडे याबाबत विचारणा केली. नाव मतदार यादीत नसल्यामुळे मतदान करता येणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यानी बैकर यांना कळविले. परंतु 2022 सालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बैकर यांचे नाव मतदार यादीत होते. त्यावेळी बैकर यांनी मतदानही केले. बैकर हे आपटी बोरघर गावचे माजी सरपंच आहेत. असे असताना मतदार यादीतून नाव कसे काय गायब झाले, असा सवाल करत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत योग्य आदेश करावेत, अशी मागणी बैकर यांनी केली आहे.