संगमेश्वर:-मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबेच्या अलिकडे मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेला जाणाऱ्या औदुंबर ट्रव्हल्सच्या बसला अचानक आग लागली. आगीचे कारण समजले नाही. मात्र, प्रवासी सुखरूप आहेत.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार विदुर सुभाष जाधव (32, चालक, रा. नरवण) हा औदुंबर ट्रॅव्हल्सची बस घेऊन येत होता. सदरची बस रत्नागिरी ते मुंबई व मुंबई ते रत्नागिरी मार्गावर धावते. सदर गाडी एसी असून तीची कॉईल ही गाडीच्या टपावर असते. 29 एप्रिलला रत्नागिरी ते मुंबई अशी ट्रॅव्हल्स गाडी (एमएच-08/एपी-8555)
घेऊन प्रवाशांसह रत्नागिरी येथून मुंबई-बोरीवली येथे गेली होती. 30 प्रवासी घेऊन परत बोरीवली-मुंबई येथून रात्री 7.30 वाजता निघाली होती. सोबत चालक दशरथ अनंत सुर्वे (रा. दापोली) व क्लिनर गौरव नवज्योत नार्वेकर होते. बस मुंबई ते गोवा रस्त्याने येत असताना काही प्रवासी चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर येथे उतरले. त्यानंतर बस पुढे जात असताना एक मे रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास कोळंबे गावच्या अलिकडे आली.
त्यावेळी ट्रॅव्हल्सच्या टपावरून धूर येऊन वास येत असल्याचे प्रवाशांनी चालकाला सांगितले. चालकाने गाडी एका बाजूला थांबवून पाहिले असता एसी. कॉईलमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने प्रवाशांना साहित्यासह खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत कॉईलने पेट घेतला होता. त्यात एसीचा पूर्ण टप व युनिट जळून नुकसान झाले.
आग लागल्याचे समजल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे, आव्हाड आणि कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली. कैस मालगुंडकर यांनी म्हात्रे कंपनीचा पाण्याचा टँकर तात्काळ पाठविल्याने आग आटोक्यात आली. गाडीचे नुकसान फार झाले नाही.