खेड:-कोकण मार्गावरून धावणाऱ्या मंगळूर एक्सप्रेसमधून एका प्रवासी महिलेचे एक लाख 56 हजार 480 रूपये किमतीची सोन्याची दोन मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसकावून पोबारा केल्याची घटना दिवाणखवटी स्थानकानजीक शनिवारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहल लहू रेवाळे या 27 एपिल रोजी मंगळूर एक्सप्रेसच्या बोगी नं. एस-6 मधील आसन क्रमांक 20 व 22 वरून झोपून प्रवास करत होत्या. ही एक्सप्रेस दिवाणखवटी स्थानकात थांबल्यानंतर मार्गस्थ होत असताना अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात घालून त्यांच्या गळ्यातील 1 लाख 56 हजार 480 रूपये किमतीची दोन मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. मंगळसूत्र चोरीला गेल्याने धक्का बसलेल्या महिलेने थेट पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली.
दहा दिवसांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पलायन केल्याची घटना विन्हेरे स्थानकानजीक घडली होती. याशिवाय दिवाणखवटी स्थानकानजीकही यापूर्वी असा प्रकार घडला होता.