19 एप्रिल 2023 पहिला खून, 27 एप्रिल 2024 दुसरा खून
रत्नागिरी गवळीवाडा येथील खून प्रकरणातील आरोपी वेदांत आखाडेची क्रूर कहाणी
रत्नागिरी:-ज्या वयात तरुणांनी नोकरी, व्यवसाय उभारी घ्यायची असते आणि आयुष्य घडवायचं असत त्याच वयात खून, मारामारी करून आयुष्याची माती करून घेणारी तरुण पिढी घडताना दिसत आहे. शनिवारी रत्नागिरी शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ एका 70 वर्षीय वॉचमनचा 20 वर्षीय तरुणाने दांडक्याने ठेचून निर्घृण खून केला. वेदांत चंद्रकांत आखाडे असे 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे वय केवळ 19 वर्ष 7 महिने आहे. एवढ्या कमी वयात त्याने दोन खून केले आहेत. तेही एका वर्षात. दोन्ही खून एप्रिल महिन्यातच केले असल्याने त्याची खुनशी वृत्ती आयुष्याची माती करण्यास कारणीभूत ठरली आहे.
खुनाची पार्श्वभूमी (पहिला खून)
वेदांत याने 19 एप्रिल रोजी रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथे शिवी दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून तरूणाचा खून केला होता. ही घटना 19 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता घडली. विल्सन सॅम्युअल वाघचौरे (35, रा बोर्डींग रोड रत्नागिरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते.
वेदांत आणि विल्सन वाघचौरे यांचे 19 एप्रिल 2023 रोजी पहाटे गवळीवाडा येथे बाचाबाची झाली. विल्सन याने शिवीगाळ केली. या रागातून वेदांत याने विल्सन याच्या डोक्यात दगड घातला. आणि तेथून पळ काढला. पहाटे पोलिसांना विल्सन हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला जिल्हा शासकीय रूग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी विल्सनच्या पत्नीने शहर पोलिसात तक्रार दिली. उपचार सुरू असताना विल्सन याचा मृत्यू झाल्याने पोलिसांकडून खूनाचे कलम दाखल करण्यात आले. त्यानंतर आता आता जवळपास वर्षभराने पुन्हा एक खून त्याने केला आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्याने आता दुसरा खून केला आहे.
वॉचमनचा खून
पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या रेगे कंपाऊंड येथे वॉचमन अशोक महादेव वाडेकर( ७० ) या वृद्धाची लाकडी दांडयाने मारहाण करुन चेहरा विद्रूप करत निर्घृण हत्या केली होती. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे रत्नागिरी शहर हादरले होते. हत्या केल्याच्या संशयावरुन पोलीसांनी वेदांत चंद्रकांत आखाडे याला ताब्यात घेतले आहे. वेदांत राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच अशोक वाडेकर वॉचमन म्हणून काम करत होते. हटकल्याच्या रागातून त्याने घराकडे निघालेल्या अशोक वाडेकर यांची हत्या केल्याचा संशय आहे.
शनिवारी सायंकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या सुमारास अशोक वाडेकर यांची पत्नी रेगे कंपाऊंडमधून आपल्या घरी जात असताना त्यांना एक मृतदेह दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. आपल्या पतीची हत्या झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. त्याचा आवाज ऐकल्याने गणेश कृपा बिल्डिंगमधील नागरिक घटनास्थली दाखल झाले. अशोक वाडेकर याच बिल्डिंगमध्ये कामाला असल्याने सर्वांनीच त्यांना ओळखले.
अशोक वाडेकर गेले काही वर्ष गणेश रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करत होते. तर रेगे कंपाऊंडच्या खालच्या बाजूला ते भाड्याने राहत होते.शनिवारी सायंकाळ ६ वाजता ते गणेश रेसिडेन्सी बिल्डिंगखाली काही रहिवाश्यांना भेटले होते. पोलिसांनी वेदांत याला अटक करून आज कोर्टात हजर करणार आहेत.