‘या’ कारणासाठी वेदांतने केला खून
रत्नागिरी:-पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या रेगे कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या गणेश रेसिडेन्सी बिल्डिंग मध्ये असलेल्या वॉचमन अशोक महादेव वाडेकर ( ७० ) या वृद्धाची लाकडी दांडयाने मारहाण करुन चेहरा विद्रूप करत निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. हत्या केल्याच्या संशयावरुन पोलीसांनी वेदांत चंद्रकांत आखाडे (२१) याला गणेश रेसिडेन्सी बिल्डिंग मधून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 1 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संशयित वेदांतला घरातून ताब्यात घेतले
वेदांत आखाडे याने अशोक वाडेकर यांचा खून काहीच घडले नाही अशा आविर्भावात घरात जाऊन बसला होता. इकडे पतीचा खून झाल्याचे पाहिल्यानंतर पत्नीने हंबरडा फोडला. बिल्डिंग मधील सारे जमा झाले. वाडेकर यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. तिने वेदांत याच्यावर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला. वेदांत हा घरातच असल्याचे पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी घराच्या दिशेने मोर्चा वळवला. तो घरात शांत बसलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले असता 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
‘या’ कारणासाठी केला खून
वेदांत हा गणेश रेसिडेन्सी बिल्डिंग वरील टेरेसवर कबुतरांना खाणे टाकायचा. त्यामुळे टेरेसवर घाण होत होती. याची माहिती वॉचमनने सोसायटीला दिली होती. त्यामुळे सोसायटीतील सर्वांनी एकत्र येत टेरेसची चावी वेदांत याला द्यायची नाही असे ठरवले. शनिवारी वेदांत सायंकाळच्या सुमारास चावी मागण्यासाठी वॉचमन अशोक वाडेकर यांच्याकडे गेला. मात्र त्यांनी सोसायटीने ठरवल्या प्रमाणे चावी दिली नाही. चावी दिली नाही म्हणून वेदांत याने राग मनात धरला होता. या रागातून त्याने वाडेकर यांच्या डोक्यात आणि तोंडावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. ७-८ वेळा जोरदार मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्याला सद्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.