रत्नागिरी:-जिल्ह्यात काजूच्या उत्पन्नात यावर्षी मोठी घट पाहायला मिळत आहे. एप्रिलचा अखेर आला तरी काजू उत्पन्नाला सुरुवात न झाल्याने बागायतदार चिंतेत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त २० टक्के उत्पन्न मिळेल, अशी शक्यता बागायतदारांकडून वर्तवली जात आहे.
अवकाळी पाऊस, धुके आणि ढगाळ हवामानाचा काजू पिकाला फटका बसला. काजूच्या झाडांना पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर जळून गेला. ज्या काजूच्या झाडांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोर आला, तो गळून गेला. ज्या झाडांना दुसऱ्या टप्प्यात मोहोर आला त्याच झाडांपासून सध्या काजू बी मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर जळून गेल्यामुळे सरासरीच्या जेमतेम ३० ते ४० टक्क्यांपर्यंतच काजू बी मिळत आहे. यंदा दुसऱ्या टप्प्यातील मोहोरापासून काजू मिळत असल्यामुळे मेअखेरपर्यंत काजू मिळणार आहेत. काजू बागेवर वर्षभर मेहनत घेऊन याच उत्पादनावर अवलंबून असलेल्या बागायतदारांना यावर्षी मोठ्या संकटाला समोरे जावे लागत आहे. साधारणतः एप्रिलच्या सुरुवातीलाच काजू हंगाम अर्ध्यावर आलेला असतो. परंतु यावर्षी एप्रिलचा शेवट आला, तरी काजू उत्पादन नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
काजू बीला हमीभाव नसल्याने आणि काजूच्या दरामध्ये दरवर्षी अस्थिरता असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. व्यापारी कमी दराने काजू खरेदी करतात. त्यामुळे वर्षभर मेहनत करून उत्पन्न मात्र तुटपुंजे मिळत आहे. त्यामुळे सरकारने काजू बीला हमीभाव द्यावा, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
रत्नागिरीत काजूच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट
