रत्नागिरी:-तालुक्यातील शीळ कदमवाडी येथे धगधगती गावठी दारूची हातभट्टी पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आल़ी. गुरूवारी सकाळी रत्नागिरी शहर पोलिसांकडून छापा टाकून ही कारवाई करण्यात आल़ी. हातभट्टी चालविल्याप्रकरणी पोलिसांनी महेश भार्गव शिंदे (रा.प्रशांत नगर,रत्नागिरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा तसेच त्याच्याकडून हातभट्टीसाठीचा 4 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून अवैधरित्या दारू विक्री, हातभट्टी, दारू विक्री याच्यावर धडक कारवाई हाती घेण्यात आली. त्यानुसार शीळ कदमवाडी येथील जंगमलमय भागात गावठी दारूची हातभट्टी चालविली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी मोठ्या फौजफाट्यासह शहर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित आरोपी हा अवैध हातभट्टी चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले.
घटनास्थळावरून पोलिसांनी 4 लाख 13 हजार रूपये किमतीचा 11 हजार लिटर गुळ, नवसागर मिश्रित रसायन जप्त केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. अवैध असलेली गावठी दारूची हातभट्टी चालविल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केला.