चिपळूण:- तालुक्यातील पेढांबे येथे असलेले विद्युत परीक्षण गोडावून फोडून अज्ञात चोरट्याने 34 हजार 800 रुपये किमतीच्या विद्युत साहित्याची चोरी केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद विजया प्रशांत भोसले (सती-चिंचघरी) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजया भोसले या पेढांबे स्वीचयार्ड, चिपळूण येथील विद्युत परीक्षण विभागात नोकरीला आहेत. त्यांच्याकडे विद्युत परीक्षण गोडावूनचा चार्ज असतो. 18 एप्रिल रोजी दुपारी 3.30 ते 19 एप्रिल सकाळी 7.30 वाजण्याच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने पेढांबे स्वीचयार्ड विद्युत परीक्षण तसेच चाचणी व उपकरण विभागाच्या गोडावूनच्या कुलपाची कडी व कुलूप तोडून गोडावून मध्ये प्रवेश करून 10800 रुपये किमतीचे पाच फूट लांबीचे तीन कॉपर रॉड, 12000 रुपये किमतीचे 95 स्क्वेअर एस. एम. कॉपर केबलचे सुमारे 15 फुटाचे दोन तुकडे, पत्येकी 20 किलो वजनाचे कॉपर असे एकूण सुमारे 40 किलो वजनाचे कॉपर, 12 हजार किमतीचे 400 स्क्वेअर एम. एस. कॉपर केबलची सुमारे दहा फुटाचे चार तुकडे, प्रत्येकी सुमारे दहा किलो वजनाचे असे एकूण सुमारे 40 किलो वजनाचे कॉपर असा 34 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार विजया भोसले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळुणात विद्युत परीक्षण गोडावूनमधून 34 हजाराच्या साहित्याची चोरी
