संगमेश्वर:- तालुक्यात पाणीटंचाईची भीषणता वाढू लागली आहे. १४ गावे व ३७ वाड्यांनी टँकरची मागणी केली आहे. यातील केवळ एक गाव व एक वाडीला सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
उर्वरित गावे टँकर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.
गतवर्षी पाऊस कमी पडल्याने व वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. विहिरींनी तळ गाठला असून, नदीनालेही कोरडेठाक पडले आहेत. सध्या पाचांबे गावातील नेरदवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय टँकरने हा पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यात यावर्षी २० एप्रिल रोजी टँकर सुरू करण्यात आला.
ओझरखोल (निढळेवाडी), मासरंग (धनगरवाडी), भडकंबा (बेर्डेवाडी, मोरेवाडी, पाकतेवाडी, पेढवाडी, मुस्लिमवाडी), शिबवणे (जुवळेवाडी व लटकेवाडी), विश्वली (राववाडी, खालचीवाडी, बौद्धवाडी, माळवाडी), पेढांबे (खालचीवाडी), ओझरेखुर्द- तळवडे (उगवत, मावळत, मधलीवाडी, नेटकेवाडी, निर्मलवाडी, खांडेकरवाडी, निवाखालचीवाडी), कोसुंब (फेपडेवाडी, फुगेचीवाडी, बौद्धवाडी), मुचरी (कासारवाडी, बौद्धवाडी, सुर्वेवाडी, मोरेवाडी, गोरेवाडी, गवळवाडी), वायंगणे (बौद्धवाडी), बेलारी (बौद्धवाडी), बेलारीखुर्द (माची धनगरवाडी), कोळंबे (वरची भरणकरवाडी) या गावांना टँकरची अद्याप प्रतीक्षा आहे.
या गावांनी पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव पंचायत समितीने टँकर मंजुरीसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच खासगी टँकर उपलब्ध करून पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पंचायत समिती यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यात १४ गावांतील ३७ वाड्यांमधून पाण्याच्या टँकरची मागणी
