रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील ज्येष्ठ नेत्या आणि रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सदस्या आसावरी शेट्ये यांचे आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्या ६२ वर्षांच्या होत्या.
मुंबई दूरदर्शनवर कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात आल्या. कालांतराने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. रत्नागिरी पंचायत समितीच्या त्या पाच वर्षे सदस्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य स्तरापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले. रत्नागिरी जिल्हा महिला पतपेढीच्या त्या संचालिका होत्या. महिला बचत गटांच्या उत्कर्षासाठी त्यांनी काम केले. महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील स्थानिक कार्यकारिणीच्या त्या सदस्य होत्या.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. बालरंगभूमीसाठी त्यांनी काम केले. रत्नागिरीत मुलांसाठी नाट्य शिबिरांचे आयोजन करणे, बालनाटकांचे दिग्दर्शन, संयोजन करून त्यांनी रत्नागिरीत बालरंगभूमीची चळवळ पुढे नेण्यात मोलाची कामगिरी बजावली. कै. शेट्ये यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले.