लांजा:-विनापरवाना देशी-विदेशी मद्याची विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पथकाने तालुक्यातील वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे धाड टाकून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 3 हजार 445 रुपयांचा गावठी तसेच विदेशी मद्याचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक डोळसवाडी या ठिकाणी एक महिला देशी-विदेशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी पोलिसांच्या पथकाने वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे मंगळवारी दुपारी 3.30 वाजता धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी तृप्ती जितेंद्र डोळस (42 वर्षे, रा.वेरवली बुद्रुक, डोळसवाडी) ही महिला गावठी हातभट्टीची दारू तसेच विदेशी मद्याच्या दारूसाठ्यासह आढळून आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत 550 रुपयांची पाच लिटरची गावठी हातभट्टीची दारू, 10 रुपये किंमतीचा एक मग, 300 रुपये किंमतीचे मॅकडॉल नंबर एक विदेशी दारूच्या 180 मिली मापाच्या दोन काचेच्या बाटल्या, 1 हजार 140 रुपये किंमतीच्या किंगफिशर स्ट्रॉंग बिअरच्या 180 मिली मापाच्या सहा काचेच्या बाटल्या, 950 रुपये किंमतीचे टुबर्ग स्ट्रॉंग बिअरच्या 180 मिलि मापाच्या पाच बाटल्या आणि 495 रुपये किंमतीचे लंडन पिल्सनर स्ट्रॉंग बिअरच्या 180 मिली मापाच्या तीन काचेच्या बाटल्या अशा एकूण 3 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी महिला हेड.कॉन्स्टेबल वैष्णवी यादव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई प्रमाणे लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.