खेड:-देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात ते आज खरे ठरले. खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर 100 फूट खोल रिक्षा उलटून एकही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
खेडहून दापोलीच्या दिशेने प्रवासी भरून निघालेली अॅपे रिक्षा नारंगी पुलाच्या जोड रस्त्यावरून शंभर फूट खोल नारंगी नदीपात्रात कोसळली आहे. हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला.
या अॅपे रिक्षामध्ये सर्व परराज्यातील कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. काम आटपून ते पुन्हा घरी जात असताना हा अपघात झाला आहे. शंभर फूट खोल नदीपात्रात रिक्षा कोसळूनदेखिल दैव बलवत्तर म्हणून कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलींचादेखिल समावेश आहे किरकोळ शारीरिक इजा वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खेडमधून दोन रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी मदतीसाठी धावून गेल्या, मात्र रुग्णवाहिका पोहोचण्याच्या आधीच अॅपे रिक्षामधील किरकोळ जखमी झालेल्या प्रवासी कामगारांनी सुरक्षित वरती येत आपले घर गाठले, तर काहींनी आपल्याला किरकोळ दुखापत झाली असून उपचाराची गरज नसल्याचे रुग्णवाहिका चालकांना सांगितले.