गुहागर:-आरजीपीपीएलमधील (रत्नागिरी गॅस) दाभोळ ब्रेक वॉटर प्रकल्पातील एकूण 167 कामगारांची कपात केली जाणार आहे. 15 मेनंतर ही कपात करण्यात येणार असून तशी नोटीस एक महिन्यापूर्वीच कामगारांना देण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा तापणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कामगारांच्या बाजूने ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएल प्रकल्प हा अगोदरच गॅसच्या तुटवड्यामुळे कमी झालेली वीजनिर्मिती, विजेचा महागडा दर अशामध्ये भरडला गेला आहे. या प्रकल्पाने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये सर्वाधिक स्थानिक कामगार होते.
या प्रकल्पाने आपल्या कार्यक्षेत्रातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन ग्रामपंचायतींचा कोटीचा कर थकविला आहे. तसेच यंदाही ऐन पाणीटंचाईच्या काळात अंजनवेल गावाला ग्रामपंचायतीने मागणी करूनही टँकरने पाणीपुरवठा केलेला नाही. अशा असंख्य कारणांनी आरजीपीपीएलवर येथील स्थानिकांची नाराजी असताना यामध्ये आता कामगार कपातीचा घेतलेला निर्णय स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा ठरला आहे. आरजीपीपीएलच्या दाभोळ ब्रेक वॉटर प्रकल्पातील सर्व आरएसडब्ल्यू कामगार जे एम्ज. एस. ऍपेक्स इन्फामध्ये कार्यरत आहेत. त्यांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, या प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आली आहेत, हे लक्षात घेऊन नमूद कामगारांना कमी करण्यात येत आहे.