हाताच्या ठशांबरोबर आता डोळे, बुबुळ होणार स्कॅन
रत्नागिरी:-जिल्ह्यातील सर्व रेशनदुकांनांमध्ये आता अद्ययावत पॉस मशिन वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये पुरवठा विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या पॉस मशिन आता रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात तब्बल 947 नवीन 5-जी पॉस मशीन दाखल झाल्या आहेत. यामुळे आता 5-जी पॉस मशीन मिळाल्यामुळे रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकांकडून व्यक्त केली जाणारी नाराजी आता दूर होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.
2017 मध्ये या सर्व रेशन दुकानांना पॉस मशिन उपलब्ध करुन देण्यात आली होती. या पॉस मशिनच्या देखरेख दुरुस्तीचे काम एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. पाच वर्ष पूर्ण होउनही सर्व रेशन दुकानदार शासनाकडून मिळालेल्या याच पॉस मशिनचा वापर करत आहेत. शिधा वाटप करताना या जुन्या पॉस मशिनमुळे खूप अडचणी येत होत्या. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाकडून आता जिल्ह्यातील 943 रेशन दुकानांसाठी तब्बल 947 पॉस मशिन प्राप्त झाल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आनंद शिधा वितरण करतानाही या पॉस मशिनमुळे खुप अडचणी येत होत्या. बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने येणारी ही अडचण लक्षात घेउन जिल्हा पुरवठा विभागाने नविन पॉस मशिन साठी राज्य अन्न आणि पुरवठा विभागाकडे मागणी केली गेली आहे. या मागणी मध्ये अद्ययावत 4 जी आणि 5 जी पॉसमशिन मिळाव्यात असा उल्लेख करण्यात आला होता. आता शासनाने या मागणीनुसार जिल्ह्यात नविन 5-जी पॉसमशिन उपलब्ध करून दिली आहे.
या नविन पॉस मशिन आधिच्या मशिनपेक्षा जास्त अद्ययावत आहेत. त्यामुळे या मशिनवर हातांचे ठसे जर जुळले नाहित तरी संबंधित व्यक्तीच्या डोळ्याचे बुबुळ स्कॅन करुन आधारकार्ड पडताळणी केली जाऊ शकते. याआधी कित्येक जेष्ठ नागरीकांच्या हाताचे ठसे न जुळल्यामुळे त्यांना रेशन दुकांनावर धान्य मिळण्यास अडचण निर्माण होत असे. तसेच आधिच्या पॉस मशीन अद्ययावत नसल्याने ग्रामिण भागात इंटरनेट नेटवर्क मिळण्याबाबतही समस्या निर्माण होत असत. मात्र आता नविन पॉस मशिन मध्ये 5-जी तंत्रज्ञान असल्याने नेटवर्क समस्या, हातांचे ठसे स्कॅन करण्याची समस्या आता नष्ठ झाल्या आहेत. तसेच या पॉस मशिनमध्ये दुकानांत असलेला स्टॉक वितरण करण्यात आलेला स्टॉक याचीही नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे नविन पॉस मशीन जितके वितरक आणि लाभार्थ्यांना सोयीचे आहे. तितकेच ते पुरवठा कर्मचाऱ्यासाठीही सोयीचे आहे.