लांजा येथील घटना
लांजा:- येथील 17 वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्या संशयिताविरुद्ध लांजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास बबन नेमान (29, रा.लांजा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांनी भादंवि कलम 376 व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनिमय 2012 (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांकडून विकास याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित युवती ही 17 वर्षीय असून जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ती नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून विकास नेमान हा त्या ठिकाणी आला. तो तिला नदीलगतच्या झुडपात घेऊन गेला. तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच 19 मार्च 2024 रोजी विकास याने पीडितेला कॉल करून काजूच्या बागेत बोलावून घेतले. पीडिता बागेत आली असता त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.
या प्रकाराबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी विकास याने पीडितेला दिली होती. त्यामुळे पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती उघड केली नाही. दरम्यानच्या काळात पीडितेला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. त्या ठिकाणी डॉक्टरनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तपासणीत पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. पीडितेला नातेवाईकांकडून जाब विचारण्यात आला असता तिने सर्व हकिगत नातेवाईकांसमोर कथन केली. नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर पीडितेने विकास याच्याविरुद्ध लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी विकास याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला तसेच तपासकामी त्याला अटक करण्यात आली.