चिपळूण:-लोकसभा निवडणुकी दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी चिपळूण पोलिसांनी काही दिवसांपासून आतापर्यंत 107 अन्वये 64 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात प्रामुख्याने काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर झालेल्या भास्कर जाधव-नीलेश राणे समर्थकांमधील राड्यांतील 32 जणांचा यात समोवश आहे.
सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून यात प्रचार यंत्रणा गतीमान झाल्या आहेत. शिवाय कार्यकर्ते प्रचारासाठी गावागावात ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधत असून बैठकांनाही काहीसा जोर आला आहे. असे असताना या निवडणूक कालावधीत पामुख्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी काही दिवसांपासून चिपळूण पोलिसांनी 107 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार आतापर्यंत तालुक्यातील 64 जणांवर ही कारवाई करण्यात आली असून यात काही दिवसापूर्वी आमदार भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांचे समर्थकांमधील झालेल्या राड्यातील 32 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगारांना देखील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यातून यापूर्वीच हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत.