मुंबई:-लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला काही तास राहिले आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत.
यातच लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पाच सुरू असताना काँग्रेसने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर निवडणुकीवर दावा केला आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करावा यावर सर्व बाजूंनी विचार करण्यात आला आहे. कोकण विभागातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपा सरकारला जनता कंटाळलेली असून भाजपा महायुतीला घरी बसवण्याचा निर्णय जनतेने केला आहे, असा दावा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला.
काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल
आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकपासह इतर मित्रपक्ष यांची महाविकास आघाडी असून काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असे नाना पटोले म्हणाले.