देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे गोताडवाडी येथे किराणा व जनरल स्टोअर्स दुकानाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्यामुळे पोस्ट ऑफीस आगीतून बचावले आहे.
करंबेळे गोताडवाडी येथे तानाजी सखाराम गार्डी यांच्या किराणा व जनरल स्टोअर्स दुकानाला सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी कनकाडी सरपंच बंटी गोताड व ग्रामस्थ सांस्कृतिक कार्यक्रम पाहून घराच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांना गार्डी यांच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. दुकानामध्ये सामान असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी दुकानाचा पाठीमागील दरवाजा फोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत किराणा व जनरल स्टोअर्सचे साहित्य, टीव्ही, फीज इलेक्ट्रॉनिक्स वस्तु जळून खाक झाल्या.
या घटना तलाठी खटके व ग्रामसेवक चौगुले आदींनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गार्डी यांचे सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्या प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गार्डी यांचा गेली 20 वर्षे किराणा व्यवसाय होता. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकत होते. संपुर्ण दुकानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने गार्डी यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.