गुहागरमधील घटना
गुहागर:-टी. बी. आजाराला कंटाळून 66 वर्षीय वृद्धने गळफास घेतला. यावर घरच्यांची कोणतीच तक्रार नसल्याने त्यांच्या अंत्यविधीची तयारी करून मृतदेह स्मशानभूमिमध्ये नेला. मृतदेहाला सरणावर ठेवले. एवढयात गुहागर पोलिसांचा फौजफाटा येऊन चक्क सरणावरून उचलून अँबुलन्सद्वारे शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आल्याची घटना गुहागर तालुक्यातील जानवळे गावात घडली.
विजय कृष्णा पोतदार ( 66 वर्षे, राहणार जानवळे वाणीवाडी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. मयत विजय पोतदार यांनी 21 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते 22 एप्रिल रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या मुदतीत आपल्या राहत्या घरातील पडवीतील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर आत्महत्येबाबत त्यांच्या दोन्ही मुलांना, पत्नी, भाऊ तसेच घरातील कोणाचीच तक्रार नाही. यामुळे त्यांनी या घटनेची खबर गुहागर पोलिसांना दिली नाही. यामुळे सोमवारी सकाळी 10 वाजता विजय पोतदार यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमिमध्ये नेण्यात आला. मृतदेह सरणावर ठेवून पुढील विधी सुरू असताना अचानक गुहागर पोलिस स्मशानभूमित दाखल झाले. सदर घटना ही आत्महत्या असून याबाबत नोंद का केली नाही अशी विचारणा करण्यात आली.
आणि मृतदेह चक्क सरणावरून उचलून अम्बुलन्समध्ये भरून शवविच्छेदनासाठी तळवली येथे नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर दुपारी एक वाजताच्या दरम्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर गुहागर पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे मयत म्हणून नोंद केली आहे.