रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या वतीने यमुनाबाई खेर यांच्या नावाने मला पुरस्कार दिला जातोय. मी या सामाजिक कामाला किती पात्र आहे, हे माहित नाही. परंतु आता जबाबदारी वाढली आहे. माझा मुलगा स्वमग्न असल्याचे कळल्यानंतर पायाखालची वाळू सरकली होती. पण गुरुंनी सांगितले तुझी क्षमता आहे म्हणूनच देवाने तुला दिव्यांगांच्या कार्यासाठी योग्य समजले. दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरवात केली. आजचा पुरस्कार ही कार्याची पोचपावती म्हणावी लागेल, असे प्रतिपादन आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे यांनी केले.
यमुनाबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात रविवारी दत्त मंगल कार्यालयात यमुनाबाई खेर पुरस्काराचे वितरण सुधाताई हातणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना पाथरे बोलत होत्या. पाथरे यांना सन्मानपत्र, साडी-चोळी आणि पाच हजार रुपये देऊन सन्मानित केले. वीणा काजरेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आस्थाचे समन्वयक संकेत चाळके यांचेही स्वागत करण्यात आले.
सुरेखा पाथरे यांचा मुलगा आल्हाद हा स्वमग्न असला तरी त्यासाठी आस्था सोशल फाऊंडेशनची स्थापना केली. दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करण्याकरिता अनेक उपक्रम सुरू केले. ० ते ६ वयोगटासाठी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, ६ वर्षावरील मुलांसाठी थेरपी, वाचा उपचार व्यवसाय, भौतिक उपचार, विशेष प्रशिक्षण दिव्यांग वकिली केंद्र, दिव्यांगासाठी हेल्पलाईन, शासकीय परवाने-सवलतीचे उपचार व निधी मार्गदर्शन, कायदेशीर पालकत्त्व, सार्वजनिक वाहतूक सवलती अशा अनेक गोष्टींसाठी आस्था काम करत आहे. डिस्ट्रिक्ट डिसअॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणून आस्थाची नुकतीच निवड झाली आहे. पाथरे यांच्या कार्याचे कौतुक याप्रसंगी करण्यात आले.