खेड:-महाराष्ट्र क्रांती सेनेच्या माध्यमातून शासनातर्फे महिला बचतगटातील महिलांना सवलतीच्या दरात शिलाई मशिनसह घरकुल देण्याचे आमिष दाखवत तब्बल 938 महिलांची 23 लाखाची फसवणूक करून फरारी झालेल्या बबन मारूती मोहिते (रा. वाराणी-कासार, बीड) या भामट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मुंबई येथून गजाआड केले. बुधवारी रात्री त्यास येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या भामट्याकडून फसवणुकीचे अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून 1600 रूपयांमध्ये महागडी हातशिलाई मशिन, घरकुले, घरघंटी व गोठा सवलताया दरात देण्या फंडा वापरत तालुक्यातील महिला बातगटातील तब्बल 938 महिलांची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संदीप शंकर डोंगरे (वाराणी-कासार, बीड) याच्या मुसक्या आवळल्या होत्या. यातील बबन मोहिते हा फरार झाला होता.
या दोघांनी तालुक्यातील बातगटातील महिलांच्या फसवणुकीसाठी 4 योजनांचे फंडा वापरताना त्यांचा विश्वास संपादन करत लाखो रूपये उकळले होते. या बाबत सर्वप्रथम येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी फसवणूक प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास गतिमान केला होता. यातील मुख्य सूत्रधार असलेल्या संदीप डोंगरे याच्या शिताफीने मुसक्या आवळल्या होत्या. या दोघांनी रत्नागिरी जिल्ह्यापाठोपाठ अहमदनगर, अकोला, बीड, परभणीसह अन्य ठिकाणच्या महिला बचत गटाची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले होते.
फसवणूक झालेल्या महिलांची संख्या तब्बल 968 वर पोहोचली होती. या प्रकरणातील बबन मोहिते हा गेल्या 10 महिन्यांपासून फरारी होता. येथील पोलिसांनी त्याला जेरबंद करण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र तरीदेखील हा भामटा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याला गजाआड करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषणाया पथकाने सापळा रचला असता त्यास मुंबई येथून जेरबंद करण्यात यश आले. गजाआड केल्यानंतर त्याला खेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या भामट्याच्या अटकेने फसवणुकीचे आणखी कारनामे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे आर्थिक फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, या दृष्टीनेही पोलीस पुन्हा नव्याने तपासाला गती देण्याची शक्यता आहे. अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.
खेडमध्ये बचतगटांना गंडा घालणाऱ्या फरारी भामट्याला मुंबईतून अटक
