लांजा:-आजाराला कंटाळून ४५ वर्षीय व्यक्तीने नदीच्या किनारी जांभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भांबेड वळणवाडी येथे दिनांक १७ एप्रिल रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबेड वळणवाडी येथील दीपक महादेव मोसमकर (वय ४५ वर्षे) याला दारूचे व्यसन होते. त्याचप्रमाणे तो गेली काही वर्षे आजारी देखील होता. या आजाराला कंटाळून तो बुधवार १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घरातून निघून गेला होता. त्यानंतर शोधाशोध करून देखील तो सापडला नव्हता. अखेर गुरुवारी १८ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता भांबेड येथील मुचकुंदी नदी जवळील जांभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेत तो आढळून आला. या प्रकरणी त्याचा भाऊ दिलीप महादेव मोसमकर (वय ४८ वर्षे) याने लांजा पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिली.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.