दोन गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात केले दाखल
लांजा:-कुऱ्हाड आणि पहारीने तिघा जणांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना लांजा तालुक्यातील पनोरे कवचेवाडी येथे गुरुवारी १८ एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इतर दोघांना जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलवण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश तुळाजी कवचे हे गुरुवारी १८ एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घराजवळच कवचेवाडी परिसरात लाकडे फोडत होते. त्यावेळी शैलेश महादेव कांबळे (राहणार पनोरे बौद्धवाडी) हा त्या ठिकाणी आला. त्याने सुरेश तुळाजी कवचे यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर हल्ला केल्याने हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जानू रघुनाथ कवचे हे त्या ठिकाणी धावत गेले असता शैलेश कांबळे याने त्यांच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने व पहारीने हल्ला केला. या हल्ल्यात जानू रघुनाथ कवचे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शैलेश कांबळे हा पुढे गेला असता सुरेश संभाजी कवचे हे आपल्या घरात झोपले होते. त्यावेळी शैलेश कांबळे याने सुरेश संभाजी कवचे यांच्या डोक्यात आणि कमरेवर पहारीने हल्ला केला. दरम्यान, अचानक झालेल्या हल्ल्यात सुरेश संभाजी कवचे हे देखील गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेप्रकरणी हल्लेखोर शैलेश कांबळे याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शैलेश कांबळे यांनी कोणत्या कारणातून हा हल्ला केला त्याचे कारण समजू शकले नाही. मात्र या घटनेने लांजा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सुरेश तुळाजी कवचे व सुरेश संभाजी कवचे यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलण्यात आले. तर रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत अधिक तपास सुरू होता.