खेड/सुदर्शन जाधव:-रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्रीरामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी होत आहे.ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे.परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत व सह्याद्री पर्वत रांगावर विराजमान झालेल्या अर्थात सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसले आहे.ह्या निसर्गरम्य गावातील ग्रामदेवता श्रीरामवरदायिनीमाता आदिशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे.
देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावाने, श्रध्देने साजरे केले जातात.देवीचे मंदिर हेमाडपंती असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे.देवीची मूर्ती कर्नाटक येथून घडवून आणण्यात आली आहे.अशा या जागृत देवीची यात्रा मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात पार पडणार आहे.सायंकाळी ६ वाजता लाट चढविण्यात येते.७ वाजता देवीची आरती झाल्यानंतर रात्री ९ वाजता परिसरातील देवदेवतांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे.देवी-देवता बरोबर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि मनोगत रात्री १० वाजता,रात्री ११ वाजता ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचवत छबिना काढला जातो.व रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवला आहे.हा परंपरागत देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्र मंडळी आप्तेष्टांसह उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ व ग्रामविकास मंडळ चोरवणे,मुंबई – पुणे यांनी केले आहे.