राजापूर:-राजापूर तालुक्यात वणवे लागण्याच्या घटना वारंवार घडत असताना गुरूवारी राजापूर तालुक्यातील हातदे येथे लागलेल्या वणव्यामध्ये एक घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रकाश सिताराम धामापूरकर यांचे हे सामाईक घर असून वणव्यात पूर्ण घर जळून सुमारे 10 लाख 48 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
हातदे येथे प्रकाश धामापूरकर यांचे सामाईक घर असून गुरूवारी ते आपल्या कुटुंबीयांसह मिळंद येथे काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळी अचानक लागलेल्या वणव्यात धामापूरकर यांच्या सामायिक घराला आगीच्या ज्वालांनी वेढले आणि त्यामध्ये घर जळून खाक झाले. शुक्रवारी सकाळी धामापूरकर कुटुंबिय घरी आल्यावर झालेला प्रकार त्यांनी पाहिला आणि सर्वजण हादरुन गेले. प्रकाश धामापूरकर यांच्यासह सुरेश धोंडू धामापूरकर, शांताराम तुकाराम धामापूरकर, रामदास तुकाराम धामापूरकर यांचे ते सामाईक घर आहे.
प्रशासनाच्या वतीने रितसर पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये घराच्या इमारतीसह घरातील कपडे, अंथरुण पांघरुण, अन्नधान्य, दागदागिने, रोख रक्कम, बॅंकेसह विविध कागदपत्रे आदी लागलेल्या आगीत भस्मसात झाली आहेत. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात सुमारे 10 लाख 48 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली असून घरात दोन सिलेंडर देखील होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. वणव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून सदरची घटना घडली त्यावेळी धामापूरकर कुटुंबीय घरी नव्हते त्यामुळे नेमकी आग केव्हा लागली ते समजू शकले नाही.