दापोली:-दापोली तालुक्यातील दाभोळ भोपण-साईलनगर येथे निजामुद्दीन बाला पावणे या 85 वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निजामुद्दीन पावणे हे भोपण साईल नगर येथे वास्तव्याला होते. आपल्या घराशेजारी असलेला पालापाचोळा एकत्रित करून ते जाळत होते. त्यांच्या पुढे असलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतल्यामुळे निजामुद्दीन पावणे विझविण्यासाठी पुढे गेले होते.
पालापाचोळ्याचा भडका उडून पावणे त्यामध्ये होरपळून गेले. ते आजारी असल्यामुळे तोल जाऊन तेथेच पडले. अधिक भाजल्याने त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत दाभोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.