दापोली:-दापोली तालुक्यातील म्हाळुंगे देवघरेवाडी येथे बसमधून उतरताना अचानक पाय घसरल्याने रस्त्यावर पडून जयश्री जगन्नाथ जाधव (58) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री जाधव (मूळ रा. पन्हाळेकाजी, सध्या रा. काळाचौकी, परळ-मुंबई) या घरगुती कार्यकमासाठी कुटुंबासह मुंबई वरून दापोलीकडे येत होत्या. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्या परळ-दापोली बसने निघाल्या होत्या. रविवारी बस म्हाळुंगे देवघरेवाडी येथील थांब्याजवळ आली. बसमधून जयश्री जाधव या उतरत असताना अचानक पाय घसरल्याने त्या जोरात रस्त्यावर पडल्या. त्यावेळी बससुद्धा निघाली असता बसचा पत्रादेखील त्यांच्या उजव्या खांद्याजवळ लागला. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून त्या मृत झाल्याचे घोषित केले.
दापोली पोलीस स्थानकात याची फिर्याद जयश्री जाधव यांचे पती जगन्नाथ जाधव यांनी दिली असून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत.