ठाणे:-व्यास क्रिएशन्स् या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे दरवर्षी भव्य दिव्य अशा ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन केले जाते. संस्थेचा 24वा ज्येष्ठ महोत्सव 29 ते 31 मार्च 2024, सहयोग मंदिर, नौपाडा (प.), ठाणे येथे उपस्थित मान्यवरांच्या, रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात संपन्न झाला. तीन दिवसीय सोहळ्याचे उद्घाटन ख्यातनाम अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यावर व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश वसंत गायकवाड यांनी व्यासचा संपूर्ण प्रवास मनोगतात मांडला.
ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती ही मूळ संकल्पना घेऊन गेली 24 वर्षे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवात ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या वर्षी आपुलकीची माणसे ही कार्यक्रमाची संकल्पना होती. या तीन दिवसीय ज्येष्ठ महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या 26 ज्येष्ठांचा जेष्ठ रत्न, सेवा रत्न, कृतार्थ जीवन, सेवा रत्न दांपत्य अशा पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले.
शुक्रवारच्या सत्रात पद्मश्री नयना आपटे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून श्यामसुंदर पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, कोकण प्रादेशिक विभाग), मीराताई कुलकर्णी (महिला समिती प्रमुख, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, कोकण प्रादेशिक विभाग), श्रीराम बोरकर (ज्येष्ठ समीक्षक), प्रकाश दिघे (अध्यक्ष, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक समिती, ठाणे), सुरेश गुप्ते (प्रमुख सल्लागार, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक समिती, ठाणे) आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचे अध्यात्मातून परमानंद हे विशेष व्याख्यान सादर झाले. त्यातून त्यांनी मानवी जीवनातील अध्यात्माचे महत्त्व आणि परमानंद विषद केले. तसेच इतिहासकार प्रशांत ठोसर यांचे शककर्ते शिवराय या विषयावर व्याख्यान झाले. त्यातून त्यांनी शिवकालीन इतिहास सांगितला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. अनिल तांबे यांना कृतार्थ जीवन पुरस्कार आणि प्रा. अशोक चिटणीस आणि डॉ. शुभा चिटणीस यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
92 वर्षाच्या पुरस्कार्थी लेखिका सुमनताई फडके यांना सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला उत्तर देताना त्यांनी आपल्या जीवन प्रवासातील लेखन, कविता आणि लावणी म्हणून दाखवल्यावर रसिक भारावले.
शनिवारच्या सत्रात ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि सिने अभिनेते अतुल महाजन प्रमुख पाहुणे म्हणून होते.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांनी त्यांच्या बहारदार शैलीत नाट्य सादर केले. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अभिनेते अतुल महाजन यांनी आपल्या भूमिकांचा प्रवास थोडक्यात विशद केला.यावेळी व्यास क्रिएशन्स् प्रकाशित जेष्ठ विश्व या अंकाचे प्रकाशन झाले.
मानसोपचार तज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांचा रे मना या मनोविषयावरील कार्यक्रमातून रसिकांशी आगळावेगळा संवाद साधला. मन हा भाग विचार भावना या गोष्टींशी संबंधित आहे, तरीही मनाला घातलेली साद ही हाक आहे. जास्त गोष्टी मनात ठेवले की चिंता वाढते त्यात अशावेळी प्रत्येक गोष्टीची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत राहावे आणि मन कोणत्याही आवडीच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. त्यात अशावेळी प्रत्येक गोष्टीची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत राहावे आणि कोणत्याही आवडत्या गोष्टीमध्ये आपले मन गुंतवून ठेवलं पाहिजे.असा सल्ला मानसोपचार तज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी आपल्या भाषणातून दिला.
कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये अखंड सावधान रे या कार्यक्रमातून मनाचे श्लोक व त्यातील अर्थ आणि आपल्या आयुष्यात मन या संकल्पनेला किती महत्त्व आहे. याविषयीचे महत्त्व आपल्या निरुपणातून उलगडून दाखवले.
रविवारच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते संजय मोने यांनी आपल्या मनोगतात व्यास क्रिएशन्स्चे कौतुक करताना ज्येष्ठांसाठी सातत्याने काम करणारी संस्थेचा गौरव केला. तसेच रौप्य महोत्सवी कार्यक्रमास पुन्हा उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
प्रकाश दिघे (अध्यक्ष, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक समिती ठाणे) आणि सुरेश गुप्ते (प्रमुख सल्लागार, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक समिती, ठाणे) या दोघांनीही आपापल्या मनोगतात मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक कार्याचा प्रवास मांडला.
त्यानंतर सुप्रसिद्ध निवेदिका दिपाली केळकर यांच्या हास्य संजीवनी या कार्यक्रमाचा आनंद ज्येष्ठ नागरिकांनी लुटला. त्यांनी वेगवेगळे हास्याचे प्रकार व त्याचे महत्त्व व आपल्या हास्य व विनोदाचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा करावा याविषयीचे विवेचन केले.
शेवटच्या सत्राची सांगता दिल ही तो है या संकल्पनेवर करा ओके गाण्यांचा कार्यक्रमाने झाली त्यात हेमंत साने आणि 55 वर्षावरील तरुण गायक इत्यादींनी हिंदी व मराठी गाणी अतिशय मेहनतीने ही उत्साहात सादर करून कार्यक्रमांना रंग चढवला व सर्व ज्येष्ठ नागरिकांनी गाण्याचा व नाचाचा आनंद लुटला.
संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके निवेदन धनश्री दामले प्रधान यांनी केले.