चिपळूण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोफळी पवारवाडी येथे मॉर्निंग स्टार कंपनीच्या मदतीने दूर्गवीर प्रतिष्ठान मार्फत लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. दूर्गवीर प्रतिष्ठान हे गेली १६ वर्षे सातत्याने अपरिचित गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करत आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक वस्तू व जीवनावश्यक वस्तू देखील गरजवंताना हे प्रतिष्ठान देत असते. महिन्यातील किमान १ रविवार गड किल्यांच्या साफसफाईसाठी द्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे सदस्य रोहित बालडे, राकेश इंदुलकर व शांताराम इंदुलकर यांनी केले.
असे आदर्शवत उपक्रम आपण वारंवार घ्यावेत व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना कळावा असे नेस्ट संस्थेचे श्री. किशोर मानकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला धोंडूबुवा सुर्वे, पांडुबुवा पवार, यशवंतबुवा सुर्वे, दीपक मानकर, तुकाराम पवार आदि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख शेषराव गरजे व मुख्याध्यापक महेंद्र गमरे सर तसेच अप्पासाहेब मदने यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व पांडुरंग मदने सर यांनी उपस्थितीतांचे स्वागत करून आभार मानले.