( दापोली )
दापोली तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विजय महादेव कळंबटे (हातखंबा, रत्नागिरी) यास येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी बुधवारी 2 वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली. ही घटना 6 जुलै 2009 रोजी घडली होती.
नराधमाने पिडित अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले होते. ही बाब पिडित बालिकेने पालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दापोली पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार नराधमास दापोली पोलिसांनी अटक केली होती. दापोली येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली असता त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
या निर्णयाविरोधात सरकारी पक्षातर्फे येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अपिल दाखल करण्यात आले होते. या अपिलावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील ऍड. मृणाल जाडकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नराधमास 2 वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली. तसेच 30 हजार रूपये दंडाच्या समावेश असून त्याने दंड भरल्यास नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी 15 हजार रूपये पिडित बालिकेस देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिला आहे.
