(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे पुलानजीक मंगळवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास ट्रेलरने कारला दिलेल्या भीषण धडकेत कारमधील परेश नामदेव खांडेकर (35, अष्टमी-रोहा), योगेश सुधाकर गुरव (34, वरसे, मूळगाव- नागाव, अलिबाग) या दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाला. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा होवून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या दुर्घटनेने खांडेकर व गुरव परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
योगेश मनोहर पाटील (वरसे, मूळगाव अलिबाग) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नवी मुबंई येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातातील मृत तरूण धाटाव एमआयडीसीतील डी.एम.सी कंपनीतील कार्यरत होते. ते सेलेरिओ कारने (एम.एाा.047 डब्लू. 1765) कोलाडनजीकाच्या कोकण रेल्वे पुलाखालील खांब येथे उजव्या बाजूने जाण्यासाठी रस्ता ओंलाडत असताना कोलाड येथून नागोठणाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलर (एम.एच.43 बी.एक्स. 9519)ने धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चंदामेंदा होवून परेश खांडेकर व योगेश गुरव जागा गतप्राण झाले. दोघांचे मृतदेह कारमध्ये अडकल्याने बाहेर काढताना कोलाड पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. अपघाताचे वृत्त कळताच तरूणांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला.
