चिपळूण:-शिमगोत्सवासाठी तालुक्यातील दोणवली येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या पती-पत्नीचा सोमवारी गुहागर-विजापूर मार्गावरील केंढे अपघात होवून दुचाकीस्वाराच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शवविच्छेदनानंतर पत्नीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांनी सोमवारी रात्री पुण्याला नेला. तसेच जखमी पतीलाही अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे.
दोणवली येथे शिमगोत्सवासाठी गौरव लक्ष्मण मिरगल व अंकिता गौरव मिरगल हे दोघे दुचाकीवरुन पुण्याहून तालुक्यातील दोणवली येथे येते होते. केंढे-रिगल महाविद्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एका अवघड वळणावर आले असता त्याची दुचाकी एका झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला होता.
यात पत्नी अंकिताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. मृत अंकिताचे कामथे उपजिल्हा रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत अंत्यसंस्कारासाठी पुण्यात घेऊन गेले. या अपघातात गौरव मिरगललाही गंभीर दुखापत झाल्याने अपघातादरम्यान एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी रात्री त्याला अधिक उपचारासाठी अन्यत्र नेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, गौरव मिरगल हा एका कंपनीत कामाला आहे. गौरव मिरगल व अंकिता मिरगल या दोघांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता.