गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना 12 बोर बंदूक, 4 जिवंत काडतुसे सापडल्याने गुहागर पोलिसांनी त्यांना अटक केलेली होती.
गुहागर तालुक्यातील पवारसाखरी गावातील अभिजीत शेटे, सुशील पवार, जोगेश भुवड, सचिन पवार, सुयोग पवार यांच्यासह चार चाकी महागड्या गाडीमध्ये 4 जिवंत काडतूसे व परवानाधारक बंदूक सापडून आल्याने गुहागर पोलिसांनी या सर्वांना अटक करून ताब्यात घेतले होते. त्यावेळी गुहागर न्यायालयाने त्यांना 2 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी सुनावलेली होती.
या प्रकरणाच्या तपासकामामध्ये, बंदुकीच्या मालकांना अटक करून ताब्यात घेण्यात आले होते.या सर्व आरोपींना चिपळूण न्यायालयामध्ये हजर केले असता, या सर्व आरोपींच्या वतीने ॲड. संकेत साळवी यांनी न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडली. सदर गुन्ह्याचे तपास काम पूर्ण झालेले असून काही तांत्रिक बाबींवर तपास काम करणे शिल्लक आहे. परंतु तांत्रिक तपास कामांमध्ये आरोपींच्या कस्टडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद ॲड. संकेत साळवी यांनी न्यायालयासमोर केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानुन या सर्व आरोपींची प्रत्येकी 25000 इतक्या रकमेच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश चिपळूण न्यायालयाने दिले. या कामी ॲड. संकेत साळवी यांना ॲड.अलंकार विखारे, ॲड. सुप्रिया वाघधरे, ॲड.पूजा माळी यांनी सहकार्य केले.