गुहागर:-शिकारीसाठी वाहनातून बंदुक घेऊन फिरणाऱ्या पवारसाखरी येथील पाचजणांना गुहागर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. आचारसंहिता जाहीर झाली असताना विनापरवाना शस्त्र मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून गुहागर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजित विजय शेटे (41), सुशिल सुधीर पवार (32), योगेश शंकर भुवड (47), सच्चिदानंद सुधाकर पवार, सुयोग सुधीर पवार (32, सर्व राहणार पवारसाखरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी 18 मार्च 2024 पासून मनाई आदेश जारी केला असल्याने गुहागर पोलिसांकडून दिवसरात्र गस्त घालण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजता शृंगारतळी येथे तपासणी सुरू असताना एमएच 06 एटी 7860 या क्रमांकाच्या वाहनामधून शिकारीसाठी वापरण्यात येणारी 12 बोर बंदुक, 4 काडतुस व 2 बॅटरी असे मिळून आले. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्याबरोबर पोलीस सहाय्यक निरिक्षक सुजित सोनावणे, येवले, पोलीस हवालदार पदीप भंडारी, हनुमंत नलावडे, पोलीस नाईक राजेश धनावडे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव चौघुले, सहदेव पवार या गुहागर पोलीस पथकाने कारवाई करत उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शस्त्र अधिनियम 3, 7, 25, आयपीसी 188, 34, मुंबई पोलिस कायदा 135 पमाणे अभिजित विजय शेटे, सुशिल सुधीर पवार, योगेश शंकर भुवड, सच्चिदानंद सुधाकर पवार, सुयोग सुधीर पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शनिवार त्यांना गुहागर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापकरणी अधिक तपास पीएसआय सुजिन सोनावणे करत आहेत.