रत्नागिरी:- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वानर आणि माकडांचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन आंबा आणि काजू हंगामामध्ये वानर, माकडांचा उपद्रव प्रचंड वाढल्याने बागायतदारांचे नुकसान होत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि गोळप परिसरामध्ये वानर, माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाने जिल्हा वार्षिक नियोजनातून त्यांना पकडण्यासाठी निधी प्राप्त करून दिला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शेतीला वानर, माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी शासनाला अनेक निवेदने देण्यात आली. उपोषणासारखी आंदोलनेही करण्यात आली. त्यानंतर वानर, माकडे पकडण्यासाठी आणि त्यांना जंगलात सोडण्यासाठी निधी मंजूर झाला. वन विभागातर्फे या भागातील वानर, माकडांना पकडण्याचे प्रात्यक्षिकही झाले; परंतु त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन आंबा आणि काजू हंगामात वानराकंडून होणाऱ्या उपद्रवामुळे बागायतदार, शेतकरी हैराण झाले आहेत. वानर, माकड पकडण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. तयार झालेला आंबा वानर आणि माकडे उड्या मारून खाली पाडतात. खाली पडलेल्या फळांचा उपयोग होत नसल्याने प्रचंड नुकसान बागायतदारांना सहन करावे लागत आहे.