रत्नागिरी:-होळी सणाकरिता चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी मार्गावर ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढती गर्दी लक्षात घेऊन वाढवण्यात आल्या आहेत.
होळीसाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले आहेत. चाकरमान्यांकरिता होळीसाठी रोहा ते चिपळूण मार्गावर आधी जाहीर करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या मध्य रेल्वेने नंतर रद्द केल्या. त्याऐवजी चिपळूणकरिता पर्यायी गाडी जाहीर करण्यात आली नाही. मात्र आता वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने ३१ मार्चपर्यंत फक्त रविवारी धावणार असल्याचे जाहीर करण्यात आलेल्या चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आहेत.
ही आठ डब्यांची मेमू ट्रेन पूर्णपणे अनारक्षित गाडी आहे. रेल्वेने आधी जाहीर केल्याप्रमाणे चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मेमू ट्रेन फक्त रविवारी सोडली जात होती. मात्र आता शनिवारी, ३० मार्च रोजी तसेच सोमवारी दि. १ एप्रिल २०२४ रोजीदेखील मेमू ट्रेनच्या फेऱ्या होणार आहेत. ही गाडी चिपळूण येथून दि. ३० मार्च तसेच १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. पनवेल येथून रत्नागिरीसाठी 01159 क्रमांकाची मेमू गाडी ३० मार्च आणि १ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे रत्नागिरीला तीन चार वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.
फेऱ्या वाढवण्यात आलेल्या मेमू लोकलचे थांबे आधीपासूनच धावत असलेल्या मेमू गाडीप्रमाणेच राहणार आहेत.