चिपळूण: येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात नुकताच पदवी व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत (पदवीदान) सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे कार्यकारी उप-प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी महाविद्यालयाची सुरुवातीपासूनची वाटचाल विषद केली. महाविद्यालयात असणाऱ्या ११ वी ते पीएच.डी. पर्यंतचे अभ्यासक्रम तसेच विविध भौतिक सुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहेत, असे त्यांनी नमूद केले व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शूभेच्छा दिल्या. न.ए. सोसायटीच्या नियामक समितीचे व्हा. चेअरमन डॉ. दीपक विखारे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात जाताना आपल्या संस्थेची मनात आठवण ठेवून पुढील वाटचाल करावी तसेच पुढे आयुष्यात कितीही मोठे झालात तरी महाविद्यालयाला विसरू नका, असे आवाहन केले.
पदवीदान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थ्यांना बाहेरील जगाचे व सद्यस्थितीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जगात केवळ १ टक्के लोक पदवी पूर्ण करतात. त्यामुळे आज या समारंभात पदवी घेवून आपण महाविद्यालयाचा सन्मान केलात. विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात नाविन्यपुर्ण काम करावे. गरज भासल्यास कौशल्य विकास करणारी प्रशिक्षणे घ्यावीत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी चिकाटी, संयम व समर्पण भावनेने काम केल्यास यश हे हमखास मिळाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना डॉ. कुलकर्णी यांनी अनेक विद्वान लोकांची उदाहरणे दिली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार स्वतः व्हावे, आणि स्वयंपूर्ण व्हावे.
तसेच निसर्गाशी नाते जोडून त्याचे रक्षण करावे. स्वतःचे आदर्श स्वत: ठरवावेत. ज्यात आवड आहे त्यात प्रभुत्व मिळवावे. स्वतःची मक्तेदारी निर्माण करावी, जेणेकरून लोक तुमच्याकडे येतील. हे सर्व करून विद्यार्थ्यांनी नियमित ध्यानधारणा करावी, तसेच स्वतःचे आत्मपरीक्षणही करावे, असे मत डॉ. कुलकर्णी यांनी मांडले. न.ए. सोसायटीच्या संचालक सौ. धनश्री बापट यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी नेहमी आनंदी व उत्साही राहून कार्यमग्न रहावे, असे आवाहन केले. शेवटी करिअर म्हणजे देशाचा चांगला नागरिक बनने आहे हे लक्षात ठेवा असे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले. या पदवीदान कार्यक्रमात पदवी स्वीकारण्यासाठी विविध शाखांतील विद्यार्थी व त्यांचे पालक, उपस्थित होते.