चिपळूण : वाशिष्ठी नदीला साडी नेसविणे हा मूर्खपणाचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया हेल्प फाऊंडेशन चिपळूणचे अध्यक्ष सतिश कदम यांनी दिली आहे. वाशिष्ठीला साडी नेसवण्याची बातमी वाचण्यात आली. हा नवीनच काय प्रकार पुढे आला आहे. नदीला साडी नेसणं यामागे काही श्रद्धा व धार्मिक कारण असू शकेल, परंतु त्याने नदीच्या एकूणच संवर्धनामध्ये काय फरक पडणार आहे. याचे उत्तर आयोजकांनी दिलं पाहिजे.
अलिकडे जी गोष्ट आपल्या हाताबाहेर जाते तिला मग धार्मिक रूप देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो, पण वाशिष्ठी नदीवर गेले चार-पाच वर्षे काम सुरू आहे. गाळ काढण्याची प्रक्रिया नागरिकांच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणावर सुरू झाली व काहीअंशी चिपळूणला पुरापासून दिलासाही मिळालेला आहे. नदी संवर्धन करायचं असेल, तर नदीचे पात्र हे स्वच्छ प्रदूषणमुक्त असावे हा आग्रह समजू शकतो. परंतु विकासाची कोणतीही गोष्ट धार्मिक किंवा परंपरेचे बांधणे अयोग्य आहे, असे मत श्री. कदम यांनी मांडले आहे. नदीमध्ये नागरिकांनी व लोकांनी प्लास्टिकचा कचरा टाकू नये, इतर कोणत्याही गोष्टी टाकू नयेत, जेणेकरून नदीचे पात्र अस्वच्छ होईल किंवा त्यास गतिरोध तयार होईल, असं कोणतेही कृती आपण करू नये, एवढे जरी पथ्य पाळलं तरी खूप चांगलं आहे. दुर्घटनेने वाशिष्ठी असो वा शिवनदी असो लोक नित्यनेमाने न चुकता पुलावर उभे राहून कचरा, निर्माल्य टाकत असतात, त्यांना हे करताना कसलाही विचार मनात येत नाही, इतका कोडगेपणा अनेकांमध्ये आहे.
अनेकवेळा सामाजिक कार्यकर्ते व या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी आवाहन, विनंती करूनसुद्धा लोक ऐकत नाहीत. अशा लोकांना परावृत्त करण्यासाठी काही काम केले जात असेल, तर त्याचे स्वागत केलं पाहिजे, साड्या नेसून नदीचे कोणतीही संवर्धन होऊ शकत नाही, किंवा तिचा विकास होऊ शकत नाही, अशा प्रकारच्या खुळचट आणि मूर्खपणाच्या गोष्टी कोण पुढे आणतो, याचेच मोठे आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले. नदीचा विकास व्हायला हवा किंवा नदी चांगली होण्यासाठी नदीतील पात्र हे रुंद करणे, नदीचा काठ बांधून घेणे, नदीच्या काठावरील मॅग्रोजचे जतन करणे, अशा प्रकारची काम हाती घेणे हे महत्त्वाची ठरतात.
अनेक ठिकाणी नदी ही गाळाने भरलेली आहे. खास करून गोवळकोटच्या नंतरचा भाग हा गाळाने भरलेला आहे. असाच विषय शिवनदीचाही आहे. दोन वर्षांपूर्वी इथले पात्र अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ करण्यात आले होते.
मात्र पुन्हा परिस्थिती तशीच होऊ लागली आहे. याकरता काही उपाययोजना करावी, याबाबत लोकांनी विचार केला पाहिजे, सर्वच गोष्टी प्रशासनावर टाकून होत नाही. नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे परंतु विकासासाठी किंवा जलपात्र जतन करण्यासाठी सांधिक प्रयत्न करणे महत्त्वाचे असते, अशा प्रकारे जर नवीन प्रथा पडू लागल्या, तर दरवर्षी हा उत्सव म्हणूनच पुढे येईल. या प्रकारच्या कृत्यांना लोकांनी स्पष्टपणे विरोध केला पाहिजे, एक तर तुम्ही भविष्यात होणाऱ्या विकासात्मक कामाला अशाप्रकारे खीळ घालू पाहात आहात असाच त्याचा अर्थ होतो. खरोखर नदीसाठी काम करायचे त्यांनी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करावा परंतु यासारखे मूर्खपणाचे प्रकार करू नये, असे श्री. कदम यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.