चिपळूण: डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘डेरवण यूथ गेम्स २४’ या क्रीडा महोत्सवातील बास्केटबॉल स्पर्धांमध्ये १५ वर्षांखालील मुले आणि याच वयोगटातील मुली या गटात सातारा येथील एनबी हूप्स या संघाने वर्चस्व गाजविले. तर १८ वर्षांखालील मुले या गटात पुणे चॅलेंजर या संघाने एनबी हूप्सचे वर्चस्व मोडीत काढून विजेतेपद पटकाविले.
शिवजयंतीनिमित्त दरवर्षी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात केले जाते. यंदा २१ मार्च ते २८ मार्च यादरम्यान हा महोत्सव पार पडला. विविध खेळांच्या स्पर्धा यामध्ये घेण्यात आल्या. बास्केटबॉल ह्या क्रीडाप्रकारांतर्गत १५ वर्षांखालील मुली,१५ वर्षांखालील मुले आणि १८ वर्षांखालील मुले ह्या वयोगटांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. १५ वर्षांखालील मुले वयोगटात उपांत्य फेरीमध्ये जेएसपीएम पुणे विरुद्ध इचलकरंजी या संघांमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. चौथ्या सत्राच्या च्या अखेरीस ३८-४२ या गुणांवर असताना ४ गुणांची जास्त कमाई करून जेएसपीएम पुणे संघ विजयी ठरला. १५ वर्षां खालील मुली वयोगटात रंगलेल्या सामन्यात एनबी हूप्स ए या संघाने सामना सहज खिशात घातला.
१५ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात रंगलेल्या सामन्यात एनबी हूप्स ए सातारा विरुद्ध जेएसपीएम पुणे या सामन्यात एनबी हूप्स ए ने विजेतेपदावर आपले नाव कोरले. १८ वर्षांखालील मुले ह्या वयोगटात चॅलेंजर्स पुणे संघाने निकालाची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवली.अत्यंत अटीतटीच्या सामन्यात चॅलेंजर्स पुणेच्या मेघ अत्रेने सर्वाधिक गुण नोंदवून विजयात सिंहाचा वाटा उचलला. ३८ विरुद्ध ३४ अशा गुणांची नोंद करून चॅलेंजर्स पुणे संघाने इतर वयोगटातील एनबी हूप्स सातारा संघाचे वर्चस्व मोडीत काढले.